प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
*नाशिक, दि. 2 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा)* : मा.भारत निवडणूक आयोग, मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडील निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यास प्राप्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशिनची भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या भारत इलेक्ट्रॉनिकक्स लिमिटेड, या केंद्र सरकारच्या कंपनीचे एकूण 26 तज्ञ इंजिनियर मार्फत प्रथम स्तरीय तपासणी (F.L.C.) निवडणूक यंत्र अभिरक्षागृह सय्यद पिंप्री, ता. जि. नाशिक येथे सुरू करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशिनच्या प्रथम स्तरीय तपासणीसाठी जिल्हयातील ११ मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी प्रथमस्तरीय तपासणी कामकाजास भेट देऊन पाहणी केलेली आहे. ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. अभिरूप मतदानासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत रॅन्डमली मतदान यंत्र अभिरूप मतदान निवडण्याची कार्यवाही ठेवण्यात आली होती. अभिरूप मतदानासाठी रॅन्डमली मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवड करावयाचे होते. त्यानुसार एकूण 6 राजकीय पक्षांच्या 11 प्रतिनिधींनी मतदान यंत्र यादृच्छिक पध्दतीने सुरक्षा कक्षातुन निवडून काढले.
प्रथम स्तरीय तपासणीमध्ये एकुण 6247 नियंत्रण संच प्रथम स्तरीय तपासणीत योग्य असल्याचे आढळून आल्याने त्याच्या 5 टक्के मशीन अभिरूप मतदानासाठी एकूण 315 नियंत्रण संच, 315 मतदान संच व 315 व्हीव्हीपॅट काढण्यात आले. जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे तसेच भारत इलेक्ट्रॉनिक लिमीटेडच्या तज्ञ इंजिनिअर्स यांच्या उपस्थितीत अभिरूप मतदान ही प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे.
प्रथम स्तरीय तपासणीअंती नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील 4919 मतदान केंद्रांसाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता 6247 नियंत्रण संच,10882 मतदान संच व 6739 व्हीव्हीपॅट उपलब्ध झालेले असुन हे सर्व यंत्र पोलीस बंदोबस्तात सय्यद पिंप्री येथील अभिरक्षा गृहात (सुरक्षा कक्ष) सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत, असे कळविण्यात आले आहे.
०००००