प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
आ. नरहरी झिरवाळांच्या प्रयत्नांना यश
8 दिंडोरी । दि. 28 प्रतिनिधी
दिंडोरी येथील प्रभाग क्र. 10 येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र बुद्ध विहार थीम पार्कला महायुती सरकारने मंजूरी दिली असून त्यास 12 कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांनी दिली.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची दिंडोरी ही कर्मभुमी असून दादासाहेब गायकवाड यांनी येथे समाज उत्थानाचे काम केले. गोरगरीब , आदिवासी, शेतकरी यांच्यासाठी त्यांनी त्याग केला. त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे आदिवासी क्रांतीकारकांचा, दिंडोरी तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांंचे कार्य जनतेसमोर सतत रहावे, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी पेठ तालुक्यात आदिवासी स्मारकही मंजूर केले आहे. दिंडोरी तालुक्यातील सामान्य जनतेसाठी ध्यान केंद्राची संकल्पना मांडण्यात आली होती. दिंडोरी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत थीम पार्कचा ठरावही झालेला होता. याच पार्श्वभूमीवर ना. नरहरी झिरवाळ यांनी विशेष प्रयत्न करुन दिंडोरी प्रभाग क्र. 10 येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ध्यान केंद्र, बुद्ध विहार व थीम पार्कला मंजूरी मिळवली. जॉगीग टॅ्रक, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ध्यान केंद्र, चबुतारा, लहान मुलांसाठी खेळण्या तसेच वृध्दांसाठी विरंगुळा केंद्र, रेनवॉटर हार्वेस्टींग प्रोजेक्ट आदींचा समावेश येथे राहील. ध्यानासाठी विपश्यना हॉल असे प्रकल्पाचे स्वरुप राहील. प्रकल्प मंजुरीसाठी नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. शासनाने याबाबत मान्यता पत्र जारी केले आहे.
प्रतिक्रिया
दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघात ना. नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बुद्ध विहारे, अभ्यासिका मंजूर झाले आहेत. दिंडोरी शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड तसेच भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेला आत्मज्ञानाचा मार्ग यावर विचारमंथन होत रहावे, यासाठी ना. नरहरी झिरवाळ यांनी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र मंजूर केले आहे. त्याचा लाभ सर्वसामान्य सर्व समाजातील जनतेला होणार आहे. देशभरातून येथे अधिकारी तसेच नेते ध्यान मार्गासाठी येतील. त्यामुळे दिंडोरीच्या आर्थिक बाजारपेठेत वाढ होणार आहे. ना. नरहरी झिरवाळ यांच्या पाठीशी सर्व आंबेडकरी जनता राहील.
नितीन गांगुर्डे, नगरसेवक दिंडोरी नगरपंचायत