प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग संचलित इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील एकलव्य निवासी आश्रम शाळेतील ९१ कंत्राटी स्वयंपाकी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर उतरले आहेत. या कर्मचाऱ्यांनी बी. एम. ए. सर्विसेस कंत्राटाअंतर्गत काम करत असून, या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार करून आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दरमहा १७ हजार रुपये पगार, महिन्याच्या ७ तारखेला पगार मिळणे, पीएफची नियमित जमा, पेमेंट स्लिप, बोनस, लिव्ह सॅलरी, हॉलिडेवर काम केल्यास डबल वेतन, सेफ्टी शूज, सेफ्टी किट आणि ESI कार्ड यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना, कर्मचारी म्हणाले, "आम्ही अनेकदा प्रशासनाला पत्रे लिहिली, परंतु आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. आता आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहील" अशी माहिती दिली.