निफाड

कांदा महाबँक योजना म्हणजे साप सोडून भुई धोपटणे; काँग्रेस नेते कृषीतज्ञ सचिन होळकर यांची टिका


रामभाऊ आवारे, प्रबंधभुमी न्युज
निफाड : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांसाठी कांदा महा बँक स्थापन करण्याची घोषणा केली मात्र ही योजना म्हणजे डोके दुखणाऱ्या माणसाच्या पायाला मलम लावण्यासारखे आहे. मुळात कांदा उत्पादकांसाठी विनाअट निर्यात सुरू करण्याची गरज आहे मात्र निर्यात शुल्क लावणे, निर्यात बंद करणे यासारखे प्रकार करून केंद्र सरकार सातत्याने कांदा उत्पादकांवर अन्याय करत आहे. केंद्राच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे मात्र आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा उत्पादकांबद्दल बेगड़ी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. लोकसभेमध्ये कांद्यामुळे चांगले नुकसान झाले आहे ते विधानसभेत होऊ नये म्हणून फसव्या योजना सरकार आणत आहे. कांदा उत्पादकांना जाहीर केलेले रोख स्वरूपाचे अनुदान देखील अजून पूर्णपणे मिळालेले नाही, अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे पीक विम्याचा देखील परतावा अद्याप पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कांदा पिकामध्ये मुळात साठवणूक ही अडचण नाही तर विनाअट निर्यात सुरळीतपणे होणे ही खरी गरज आहे. कांदा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांकडे यंत्रणा उपलब्ध आहे किंवा शेतकरी स्वतः देखील कांदा साठवू शकतो त्यासाठी शासनाने अनुदान मर्यादा वाढवावी आणि जलद अनुदान द्यावे मात्र कांद्याला वर्षभर बाजारभाव कसे राहतील याकडे सरकारने बघणे आवश्यक होते असे मत प्रसिद्ध कृषीतज्ञ तसेच काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

Related News