ठाणगाव - विविध नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांच्या होणा-या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधान मंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या वर्षात ही पिक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) या तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्या अनुषंगाने खरीपासाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी केले आहे. या पिक विमा योजनेत अनुसूचित क्षेत्रात पीक घेणारे, कुळाणे अगर भाडे पट्टीने शेती करणा-या शेती सह सर्व शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. तसेच पीक विमा कर्ज घेणा-या आणि बिगर कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभाग ऐच्छिक असणार आहे. भाडे पट्टीने शेती करणा-या शेतक-यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणी कृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपर्यंत दायित्व राहणार असून यापेक्षा नुकसान भरपाई विमा हप्त्याच्या ८० टक्क्यापेक्षा कमी असल्यास विमा कंपनी एकुण २० टक्के रक्कम स्वत:कडे नफा म्हणून ठेवेल व उर्वरित रक्कम राज्य शासनास परत करेल. या योजनेत खरीप हंगामातील भातशेती, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, खुरासणी, मूग, उडीद, तुर, मका, कांदा कापूस या पिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे मार्फत राबविली जाणार आहे. याकरिता सात बारा, ८अ उतारा, आधार कार्ड, व बॅक पासबुक झेरॉक्स, पिक पेरा स्वंय घोषणा पत्र यांचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रति हेक्टरी भात-४९५०० रुपये, ज्वारी व बाजरी- ३००० रुपये, नाचणी- १३७५० रुपये, भुईमूग- ४२९७१ रुपये, सोयाबीन-४९५०० रुपये, खुरासणी- १३७५० रुपये, मूग व उडीद- २००० रुपये, तुर- ३६८०२ रुपये, कापूस- ४९५०० रुपये, मका- ३५५९८- रुपये, कांदा-८१४२३ रुपये आहे. पिक विमा भरण्यासाठी व अधिक माहिती करीता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच नजिकच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया-" तालुक्यात कोरडवाहू शेती असून केवळ पावसाच्या भरोसावर खरीप हंगामात शेती केली जाते. अवेळी पाऊस, पावसाचा खंड, रोपवाटिका पावसा अभावी जळली, पेरणीचा हंगाम लांबणीवर, पावसाची उघडीप, निया पावसाळा संपल चालला आहे तरी अद्याप तरी लागवडीसाठी पाऊस पडला नाही. या कारणासाठी एक रुपया पिक विमा भरणे आवश्यक आहे. - तालुका कृषी अधिकारी- प्रशांत रहाणे.