निफाड

पाऊले चालती पंढरीची वाट

रामभाऊ आवारे प्रबंधभुमी न्युज

निफाड - वारीमध्ये आपल्याला दोन पालख्यांचा सोहळा पाहायला मिळतो. एक संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि दुसरी संत तुकाराम महाराजांची. पालखीचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे रिंगण. असंख्य भक्तगण विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर असतात आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी पूर्ण होते, पूर्ण करतात. या वारीमध्ये असंख्य दिंड्या देखील सामील असतात. वारकऱ्यांची भोजन व्यवस्था व इतर व्यवस्था पाहणे हे त्या दिंड्यातील लोकांचे काम.तसेच हे काही दिवस आपले घरदार सोडून वारकरी वारी मध्ये आलेले असतात. या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त देवाचे नामस्मरण, भजन, किर्तन आणि तसेच हरीचे नाम, विठुरायाचे नाम घेत असतात. उठता बसता फक्त विठ्ठलाचे नामस्मरण हे वारकरी करत असतात. समतेचा संदेश देणारी ही वारी अनेक वारकऱ्यांना आपल्यामध्ये सामील करते. सर्व भेदभाव विसरून, सर्व अहंकार बाजूला सारून, सर्व जाती धर्म विसरून, या वारीमध्ये असंख्य भक्तगण येतात आणि रमून जातात. काही काळासाठी स्वतःची दुःख, त्रास, विवेचना सर्व काही बाजूला ठेवून सर्व फक्त विठुरायाच्या भक्तीत लीन होतात. त्यागाचे आणि भक्तीचे स्वरूप या वारकरी लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही वारी पंढरपूर मध्ये समाप्त होते. पंढरपूर हे महाराष्ट्र मधील एक तीर्थक्षेत्र आहे. भीमा नदीच्या काठी असलेले विठ्ठल मंदिर म्हणजेच पंढरपूर. यालाच दक्षिण काशी देखील असे म्हणतात. भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात, कारण भीमा नदी, शहराजवळ चंद्रभागासारखा आकार घेते.आपल्या लाडक्या देवाची उपासना आणि त्याच्या नामाचा गजर या वारीमध्ये सतत आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतो. वारकरी या वारीमध्ये तल्लीन होऊन नाचतात. हरिनामाचा गजर करतात. रोज वीस किलोमीटर पायी प्रवास करून देखील हे वारकरी तेवढेच उत्साही असतात. या वारीमध्ये अगदी साठ वर्षाच्या वरील वृद्ध व्यक्ती देखील तरुणांप्रमाणेच जोशामध्ये असतात. प्रत्येक वारकऱ्यांच्या अंगी उत्साह संचारतो.

Related News