निफाड

पंढरीची वारी -लाडक्या विठुरायाला भेटण्याची आतुरता, ओढ, समतेची शिकवण देणारी

रामभाऊ आवारे, प्रबंधभुमी न्युज

निफाड - जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी, भेटी लागी जीवा लागलीस आस या संत वचनाप्रमाणे आषाढी- कार्तिकी वारीला लाखो भाविक वारकऱ्यांचा आराध्य दैवत पंढरीसी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी जात असतात.वारकरी संप्रदायासाठी वारी खूप महत्त्वाची असुन महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाच्या वारीच्या परंपरेची सवयच आहे. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी जनसामान्य पदयात्रा काढतात त्यालाच वारी असे म्हणतात आणि ही पदयात्रा करणाऱ्याला वारकरी असे म्हणतात. वर्षानुवर्ष वारकरी संप्रदाय वारीची ही परंपरा जपत आला आहे आणि यापुढेही जपत आहे.एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत या वारीच्या परंपरेची जपणूक चालत आहे. प्रत्येक कुटुंबातील एक तरी सदस्य वारीला जाऊन आलेला असतो आणि तशी मग ती एक प्रथाच पडते की एकदा तरी वारीला जाऊनच यावे आणि विठुरायाची गळा भेट घ्यावी. 

 वारीत चालणारे हे वारकरी कशाचीही तमा न बाळगता पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतात. अनेक दिवस, अनेक आठवडे हा त्यांचा प्रवास चालू असतो आणि मग स्वतःच्या लाडक्या विठुरायाला भेटून सगळा शीण आणि त्रास निघून जातो व वारकरी विठुरायाशी एकरूप होतो.वारीत सामील झालेले, शुभ्र वस्त्र धारी वारकरी, असे वाटते की त्यांनी शुद्धता आणि सात्विकता परिधान केली आहे. शुभ्र पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, धोतर, कपाळावरती टिळा आणि गळ्यात तुळशीच्या माळा. हा असतो वारकऱ्यांचा पेहराव. तसेच या वारीमध्ये स्त्रिया देखील मागे नाहीत. कारण डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला देखील वारीमध्ये सहभागी होतात.लाडक्या विठुरायाला भेटण्याची आतुरता, ओढ, समतेची शिकवण देणारी अशी ही पंढरीची वारी. अश्या या वारीला दरवर्षी अफाट प्रतिसाद मिळतो आणि प्रत्येक वर्षी हा वाढतच जातो. कधी ही न संपणारी अशी सुंदर परंपरा, ज्यात विठ्ठलाची उपासना केली जाते. त्यात साथ मिळते ती असंख्य अश्या वारकऱ्यांची. आयुष्यात एकदा तरी या वारीला जाऊन यावे. त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि आपले जीवन धन्य करावे.

Related News